Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांना मोठा फटका, ‘जेईई-मेन्स’ परीक्षा कोरोनामुळे स्थगित

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २७ ते ३० एप्रिलदरम्यान होणारी अभियांत्रिकीसाठीची प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी ट्विटरवरून याची माहिती दिली.

Advertisement

देशातील कोरोनाची सध्याची स्थिती लक्षात घेत राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) परीक्षा स्थगित करण्याचा मी सल्ला दिला होता. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांची शैक्षणिक कारकीर्द वाचवणे ही आपल्या मंत्रालयाची प्राथमिकता आहे, असे ट्विट निशंक यांनी केले.

Advertisement

सरकारच्या सल्ल्यानुसार एनटीएने आता ‘जेईई-मेन्स’ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या नवीन तारखेची घोषणा नंतर करण्यात येईल. परीक्षेच्या किमान १५ दिवस अगोदर नवीन तारीख सांगण्यात येईल, असे एनटीएने म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे यंदा विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ही परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित केली जाणार आहे.

Advertisement

यामुळे विद्यार्थ्यांना आपले गुण वाढविण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. याअंतर्गत पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती. मार्चमध्ये दुसरी आणि पुढचे सत्र एप्रिल व मे मध्ये आयोजित केले जाणार होते. परीक्षेच्या पहिल्या सत्रात ६.२ लाख तर दुसऱ्या सत्रामध्ये ५.५ लाख विद्यार्थ्यांनी जेईई-मेन्स दिली होती. विशेष म्हणजे कोरोनामुळे नुकतेच सीबीएसईने १० वीची बोर्ड परीक्षा रद्द तर १२ वीची परीक्षा लांबणीवर टाकली होती. याच पद्घतीने सीआयईएससीई बोर्ड व अनेक राज्यांनी आपापल्या बोर्डाची परीक्षा एक तर रद्द किंवा स्थगित केली आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement