Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक घटना! सेल्फीचा नाद जीवावर बेतला, युवक-युवतीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

महाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021 :- गणेशगुडी (ता. जोयडा) येथे पर्यटनासाठी आलेल्या युवक-युवतीचा काळी नदीवरील पुलावर सेल्फी घेण्याच्या नादात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर दोघांचा नदीपात्रात शोध सुरु होता. आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते सेल्फी घेत असलेल्या पुलाखालीच दोघांचेही मृतदेह आढळून आले.

Advertisement

पुरुषोत्तम पाटील (22) आणि रक्षिता चिद्री (20) अशी त्यांची नावे आहेत. पुरुषोत्तम हा बिदर येथील कर्नाटक कॉलेजचा बीएचा विद्यार्थी होता. रक्षिता हीचे मूळ गाव बिदर असून ती सध्या गुलबर्गा येथील एका महाविद्यालयात शिकत होती.

Advertisement

ते दोघे दांडेली येथे फिरण्यासाठी आले होते. सोमवारी रिक्षाने ते गणेशगुडी येथे दाखल झाले. नदीकाठावर फिरत असताना त्यांना धरणाजवळ असलेल्या एका पुलावर जाऊन सेल्फी घेण्याचा मोह झाला. यावेळी तोल जाऊन युवती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या नादात युवकही नदीपात्रात कोसळला. युवक-युवती बुडाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. सोमवारी सायंकाळपासून शोध मोहीम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्यांचे मृतदेह मिळाले नव्हते.

Advertisement

आज सकाळी फ्लायकॅचर या रिवर राफ्टींग टीमच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पुलाखालून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement

गणेशगुडी आणि दांडेली परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. अनेक ठिकाणी काळी नदीचे पात्र संथ व शांत दिसत असले तरी जागोजागी धोके आहेत. या जागांची माहिती नसतानाच सेल्फी व पाण्यात उतरण्याचा प्रयत्न महागात पडतो. त्याचाच प्रत्यय सोमवारी देखील आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

Advertisement
Advertisement