Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : नांदेडमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदाराचे कोरोनामुळे निधन

महाअपडेट टीम, 10 एप्रिल 2021 :- नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

काही दिवसांपूर्वी अंतापूरकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

रावसाहेब अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

Advertisement

राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

Advertisement
Advertisement