मोठी बातमी : ‘या’ राज्यात पहिली ते ११ वीपर्यंतचे विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण
महाअपडेट टीम, 13 मार्च 2021 :- देशभरात कोरोना महामारीने पुन्हा एकदा चांगलेच डोके वर काढले आहे. या काळात ऑनलाईन शिकवणी व परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणाला हरताळ फासत केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये इयत्ता पहिली ते ११ वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्यात आले आहे.
त्यामुळे पुद्दुचेरी शालेय शिक्षण मंडळाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त होत आहे. ऐन विधानसभा निवडणूक सुरू असतानाच पुद्दुचेरीत परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात ढकलण्यात आले आहे. या संबंधित एका प्रस्तावाला राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी मंजुरी दिली. त्यामुळे पहिली ते ११ वीच्या विद्यार्थ्यांना सुखद धक्का बसला आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, शेजारील तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी ९ वी, १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षेविना पास करण्याची घोषणा केली. दाक्षिणात्य राज्य केरळ आणि आंध्रप्रदेशनेही असाच निर्णय घेतला आहे.
सहामाही व तिमाही परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. हाच कित्ता आता पुद्दुचेरी सरकारने गिरविला आहे. परंतु विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत शाळेत हजेरी लावावी लागणार आहे.