राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, दोन दिवसांत ५ मंत्री पॉझिटिव्ह
महाअपडेट टीम, 18 फेब्रुवारी 2021 :- देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,09,63,394 वर पोहोचला आहे.राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक नेते मंडळी सुद्धा देखील कोरोनाची लागण झाली आहे.
नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.
बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ते ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष आहेत. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला आणि बाल विकास, कामगार या मंत्रालयांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे अकोल्याचं पालकमंत्रिपदही सोपवलं आहे.