महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- भारतीय जनता पार्टी केवळ देशभरातच नाही तर शेजारील देशांमध्येही विस्तारित करण्याची योजना आखत आहे. गृहमंत्री अमित शाह नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये भाजपा सरकार स्थापन करण्याची योजना आखत असल्याचे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी दावा केला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले बिप्लब देब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
‘अमित शहा जेव्हा भाजप अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी आम्हाला पक्ष वाढवायचा असल्याचं सांगितलं होतं. नेपाळ आणि श्रीलंकेतही सत्ता स्थापन करण्यासाठी योजना बनविल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं’, असा दावा बिप्लब देब यांनी केलाय. अमित शहा यांनी राज्याच्या अतिथीगृहात कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित वक्तव्य केल्याचं बिप्लब देब यांचं म्हणणं आहे.
त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतलातील भाजपाच्या एका कार्यक्रमात बिप्लब कुमार देब बोलत होते. या राजकीय वक्तव्यामुळे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यावर पुन्हा एकदा विरोधकांडून टीकेची झोड उठवली जात आहे.
नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या देशांच्या सार्वभौमाविरुद्ध हे विधान आहे, देब यांच्या या विधानांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस आणि सीपीए या विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.