महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यासाठी मदत केलीये, आशिष शेलारांचा गंभीर आरोप
महाअपडेट टीम : 04 फेब्रुवारी 2021:- एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी याने हिंदुविरोधी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. शर्जिल उस्मानीला महाराष्ट्र आणि मुंबईबाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं आहे. असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
आशिष शेलार यांनी शिवसेनेवरही हल्ला चढवला आहे. शिवसेनेची अवस्था खाली डोकं वर पाय अशी झाली आहे. परदेशातून कोणी देशावर टीका केली तर शिवसेनेला आनंदाच्या उकळ्या फुटतात. लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलनाला राऊतांचं समर्थन आहे का ? उलट त्यांनी परदेशातील व्यक्तींवर टीका करायला पाहिजे. त्यांच्यावर टीका करायला तोंड शिवलंय का? असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे.
आपल्या राज्यावर कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशातील विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे राऊतांनी जनतेसमोर मांडायला पाहिजे.
भाजपने दोन दिवस शर्जिल उस्मानीच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगीच का दिली?, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली.