Budget 2021 : पेट्रोल आणि डिझेलवर कृषी सेस, परंतु ‘ह्या’ कारणानं दरवाढ होणार नाही !
महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. त्यांनी भाषणाच्या सुरूवातीला सांगितले की, कोरोना संकटानंतर सरकारने अनेक मिनी बजेट आणले आहेत. या वेळेचे बजेट हे कोरोना साथीच्या आजारामुळे पेपरलेस झाले आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी आपले हे तिसरे बजेट टॅबच्या माध्यमातून सादर केले.
पेट्रोल आणि डिझेलवर कृषी सेस लावला आहे. पेट्रोलवर प्रति लीटर 2.50 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये प्रति लीटर कृषी सेस लावण्यात आलायं . तथापि, यामुळे पेट्रोलच्या दरात कोणताही वाढ होणार नाही, या झालेल्या दरवाढीवर ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार नाही. कोरोना कालावधीत तेल कंपन्यांना झालेला नफा हा तेल कंपन्यांकडूनच काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर कृषी सेस लावण्याबरोबरच सरकारने बेसिक उत्पादन शुल्क (बीईडी) आणि विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (एसएईडी) कमी करण्यात आले आहे. यामुळे कृषी सेसचा बोजा पेट्रोल दरवाढीवर होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त बीईडी 1.4 रुपये आणि 1.8 रुपये प्रति लीटर लावला आहे.तसेच अनब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर एसएडीही लावला आहे. पेट्रोलवर 11 आणि डिझेलवर 8 रुपये प्रति लीटर टॅक्स लावला आहे.
अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले की, काही गोष्टींवर कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर (एआयडीसी) लादण्याचा माझा प्रस्ताव आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत उपकरांमुळे भाव वाढल्यास सर्वसामान्यावर अधिक भार पडेल. परंतु, सध्याच्या शेती सेसचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्यावर लादला जाणार नाही.
पेट्रोलचे आजचे दर :-
दिल्लीत आज 1 फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल 86.30 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 76.48 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. पेट्रोलचे दर प्रति लिटर 92.86 रुपये आणि डिझेलचे दर. 83.30 रुपये आहेत.
कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली नाही. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 87.69 रुपये आणि डिझेलचे दर 80.08 रुपये आहेत.