मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “जर हा माणूस खोटा असता तर…”
महाअपडेट टीम 15 जानेवारी 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले होते, परंतु आज मुंडेंची पाठराखण करत जोपर्यंत चौकशीतून काही समोर येत नाही, तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.
यया दरम्यान आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे मतदानाचा हक्क बजावला. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पवार म्हणाले,
धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
परंतु तरीदेखील हे प्रकरण बदनामी आणि ब्लॅकमेलिंग संबंधी असल्याची माहिती समोर येत आहे.मात्र या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी अगोदरपासूनच सर्व सत्य परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे. जर हा माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता असे म्हणत एकप्रकारे रोहित पवार यांनीही धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.