10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं झालं ! महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट होणार
महाअपडेट टीम 9 जानेवारी 2021 :- भंडारा जिल्हा रुग्णालयात १० नवजात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मरण पावल्याची मनाला पिळवटून टाकणारी घटना काल मध्यरात्रीनंतर घडली होती. तर या घटनेत जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
त्यामुळे आता लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या शासकीय रुग्णालयात 10 नवजात चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर सरकार जाग आली आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत.
बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली असून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.