मोठी बातमी : मुंबई महापालिका एकटेच लढणार, भाई जगतापांनी दिला स्वबळाचा नारा
महाअपडेट टीम 6 जानेवारी 2021 :- मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुन्हा एकदा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.काही दिवसांपूर्वीच भाई जगताप म्हणाले होते की, राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत.
त्याचाच दुजोरा देत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिल्यानं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वॉर्डमध्ये आम्ही 100 दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखला आहे, वॉर्डनिहाय आम्ही रिव्ह्यू करून एकटं लढण्याचा आमचा निर्णय हा ठाम आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्तानं काँग्रेसनं केलीय.
मनपाच्या तिजोरीवर केवळ 168 कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचं असल्याचं मतही भाई जगतापांनी व्यक्त केलंय.
देशात एका राज्याएवढं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक ही 2022 मध्ये होणार असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.