लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना अपघात, कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू
महाअपडेट टीम, 08 डिसेंबर 2020 :-औरंगाबादहुन जालन्याकडे येताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात आज दुपारी एक वाजता पाथ्रीकर कॅम्पस समोर घडला.
लग्नसोहळा उरकून येत असताना या भरधाव कारने जोडप्याच्या मागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहचत कारचालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्य माहितीनुसार, गारखेडा तांडा येथील रामेश्वर बाबुराव चव्हाण (वय ४५) व त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय ४०) असे दोघे औरंगाबाद येथे एका लग्न सोहळ्यासाठी आले होते.
लग्नसोहळा आटपून दोघे दाम्पत्य दुचाकीने (एमएच २८ एए ४०९५) गावाकडे परतत असताना भरधाव वेगाने जालन्याकडे जाणाऱ्या कारने (एमएच ०१ बीएफ ९३९१) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रामेश्वर व इंदूबाई चव्हाण दाम्पत्य गंभीर जखमी झाले असता रस्त्यावरच त्यांचा मृत्य झाला.
अपघातानंतर कार चालक पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून त्याला नागेवाडी टोलनाक्यावर अडवून पकडले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, माहिती मिळताच बदनापूर ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, सहायक फौजदार श्री. खंडागळे, इब्राहिम शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.